कोपरगावात ‘पराग’चा खोटा फुलोरा; सत्तेच्या हव्यासापोटी भविष्याची ‘फेकाफेकी’ आणि दिखाऊ समाजकार्याचा बुरखा फाटला!

कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले पराग संधान सध्या शहराच्या भविष्याचे स्वप्न रंगवत फिरत आहेत. मात्र, त्यांच्या या ‘विजन’मागे केवळ सत्तेचा स्वार्थ आणि निवडणुकीपुरता उफाळून आलेला कळवळा असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावच्या सार्वजनिक जीवनात वावरत असताना ज्यांना कधी शहराच्या समस्या सोडवता आल्या नाहीत, ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरताच ‘भविष्य’ घडवण्याच्या गप्पा मारत असल्याने कोपरगावकरांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

‘९४ पासून होतो, पण कोणालाच दिसलो नाही!’; संधान यांचा समाजकार्याचा अजब दावा
एका मुलाखतीत पराग संधान यांनी आपण १९९४ पासून सामाजिक कार्यात असल्याचा दावा केला आहे. मात्र, कोपरगावची जनता प्रश्न विचारत आहे की, जर तुम्ही इतकी वर्षे कार्यरत होता, तर २०१६ पर्यंत तुमचे नाव कोणीच ऐकले नव्हते का? सत्तेत असताना आणि कोल्हे गटाचा वरदहस्त असतानाही संधान यांनी शहराच्या पाण्याचा, रस्त्यांचा किंवा धुळीचा प्रश्न का सोडवला नाही? आता निवडणूक आली म्हणून “मी ३६५ दिवस उपलब्ध आहे” असे म्हणणे, म्हणजे निव्वळ राजकीय संधीसाधूपणा असल्याची चर्चा शहरात आहे.

केवळ ‘विहार’ आणि ‘वर्धापन दिन’; विकासाचे काय?
मुलाखतीदरम्यान संधान यांनी आपण वाढदिवस साजरे केले, मंदिरांच्या वर्धापन दिनाला गेलो, अशा गोष्टींचा उल्लेख केला. मात्र, कोपरगावला खऱ्या अर्थाने कोणाची गरज आहे – केवळ शुभेच्छा देणाऱ्याची की प्रत्यक्ष विकास करणाऱ्याची? संधान यांनी मांडलेले ‘धूळमुक्त कोपरगाव’चे विजन हे केवळ निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील एक वाक्य वाटते. ४० वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या कोल्हे गटाचे ‘लाडके’ असतानाही त्यांना कधी धुळीची अडचण जाणवली नाही, हे विशेष.

विरोधकांना लक्ष्य करून स्वतःची उणीव झाकण्याचा प्रयत्न
मुलाखतीत स्वतःच्या कामाचा पुरावा देण्याऐवजी संधान यांनी विरोधकांना “तुम्ही काय केले?” असा प्रश्न विचारला. मात्र, कोपरगावची जनता जाणते की, आमदार आशुतोष काळे यांनी पाण्याच्या प्रश्नासह अनेक मूलभूत कामे पूर्ण केली आहेत. स्वतःकडे सांगण्यासारखे मोठे प्रकल्प नसल्याने संधान केवळ “मी गल्लीबोळातील नावे सांगू शकतो” असा दावा करत आहेत. गल्लीबोळातील नावे माहिती असणे म्हणजे विकास करणे नव्हे, हे संधान विसरले असावेत.

संधीसाधू राजकारण आणि फसव्या घोषणा
निवडणूक जाहीर झाल्यावर “मला शहराचे भविष्य घडवायचे आहे” असे म्हणणे हे संधान यांचे राजकीय ‘गिमिक’ असल्याची टीका होत आहे. २०१६ मध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांना आता पुन्हा सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. ४० वर्षांपासून सत्तेत असूनही जे कोल्हे गटाला जमले नाही, ते संधान कसे करणार, हा मोठा प्रश्न आहे.

कोपरगावची सुज्ञ जनता अशा ‘दिखाऊ’ आणि ‘खोट्या विजन’ला बळी पडणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेला हा कळवळा मतदानानंतर पुन्हा गायब होणार, याची खात्री नागरिकांना पटली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!