कोपरगावात कोल्हेंचा ‘स्वच्छतेचा दिखावा’; ४० वर्षे सत्तेची ऊब भोगली, आता निवडणुकीच्या तोंडावर ‘समाजकार्याचा’ उमाळा?

Kolhe's 'show of cleanliness' in Kopargaon

कोपरगाव: कोपरगावच्या राजकारणात सध्या ‘दिखाऊ’ समाजकार्याचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून कोपरगावच्या सत्तेची सर्व सूत्रे हातात असूनही ज्यांना कधी शहराच्या घाणीची आणि प्रदूषणाची अडचण वाटली नाही, अशा कोल्हे परिवाराला आता निवडणुकीच्या तोंडावर अचानक स्वच्छतेचे स्वप्न पडू लागले आहे. विवेक कोल्हे आणि पराग संधान यांनी गोदावरी नदीकाठी केलेला स्वच्छतेचा बनाव म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे.

४० वर्षांची निष्क्रियता अन् दोन तासांचा फोटो इव्हेंट!
कोपरगावमध्ये कोल्हे गटाची सत्ता असताना शहराचे प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत पडले आहेत. रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला असताना, विवेक कोल्हे आणि त्यांचे सहकारी आता हातात झाडू घेऊन फोटो काढण्यात व्यस्त आहेत. “ज्यांनी ४० वर्षे आमदारकी आणि सत्ता भोगूनही गोदावरीचे प्रदूषण थांबवले नाही, त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावरच नदीची आठवण का झाली?” असा जळजळीत सवाल नागरिक विचारत आहेत. हा निव्वळ निवडणुकीपुरता केलेला ‘स्टंट’ असून यामागे केवळ सत्तेचा स्वार्थ दडलेला आहे.

जनतेला मूर्ख समजण्याचा ‘कोल्हे पॅटर्न’
पराग संधान आणि विवेक कोल्हे सध्या शहरात फिरून लेझर शो आणि बोटिंग क्लबच्या वल्गना करत आहेत. मात्र, ४० वर्षात साधी मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता करू न शकणारे हे नेतृत्व आता आधुनिकतेचा बुरखा पांघरून जनतेला ‘फूल’ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ४० वर्षे जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवून आता मतदानाची तारीख जवळ आल्यावर नदीकाठी श्रमदान करण्याचे नाटक करणे, हा कोपरगावकरांच्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे.

समाजकार्य की सत्तेसाठी लाचारी?
नेहमी एसी गाड्यांमधून फिरणारे हे नेते आता निवडणुकीसाठी चिखलात उतरून फोटो काढत आहेत. गेल्या ४० वर्षात कोपरगावच्या विकासाचा जो अनुशेष राहिला, तो केवळ निवडणुकीच्या आधी दोन दिवस झाडू मारून भरून निघणार नाही. सत्तेचा वापर केवळ स्वतःच्या साम्राज्यासाठी करणाऱ्या या नेतृत्वाला आता समाजकार्याचा जो पुळका आला आहे, तो केवळ ‘मतं’ मिळवण्यासाठी लावलेली एक चाल आहे, हे आता लपून राहिलेले नाही.

कोपरगावकर हिशोब मागणार!
४० वर्षे सत्तेत असताना कधीही स्वच्छतेची शपथ न घेणाऱ्या या नेत्यांना आता अचानक गोदावरी मातेची आठवण का आली? हा निव्वळ राजकीय संधीसाधूपणा आहे. कोपरगावची जनता आता अशा फसव्या ‘दिखाव्याला’ बळी पडणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेले हे पुतणा मावशीचे प्रेम कोल्हे आणि संधान यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!