कोपरगाव: कोपरगाव निवडणुकीच्या रणधुमाळीत समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचे प्रकरण आता पूर्णपणे उलटल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पोलिसांना निवेदन देण्यासाठी भाजप नेते विवेक कोल्हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले असले, तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळीच असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. विवेक कोल्हे यांच्याच कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली असून, आता पोलीस ठाण्यात जाऊन दुसऱ्यांवर आरोप करणे हा एक राजकीय बनाव असल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला जात आहे.
बनावट ‘सिम्पथी’ मिळवण्याचा प्रयत्न?
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेले बाबासाहेब ठोंबरे हे कोल्हे कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जातात. असे असतानाही त्यांना भररस्त्यात मारहाण झाली. आता या प्रकरणातील धक्कादायक बाजू अशी समोर येत आहे की, ही मारहाण विवेक कोल्हे यांच्याच कट्टर समर्थकांनी घडवून आणली आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि विरोधकांना बदनाम करण्यासाठी स्वतःच्याच माणसाला मारहाण करायची आणि नंतर पोलिसांकडे जाऊन न्यायाची मागणी करायची, असा हा ‘राजकीय स्टंट’ असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस ठाण्यातील ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा
सोमवारी विवेक कोल्हे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आक्रमक पवित्रा घेतला आणि “शहरातील शांतता दूषित करण्याचा हा प्रयत्न आहे” असा दावा केला. मात्र, स्थानिक प्रत्यक्षदर्शी आणि राजकीय विश्लेषकांच्या मते, कोल्हे यांनी स्वतः केलेल्या कृत्यावर पडदा टाकण्यासाठीच हा निवेदनाचा घाट घातला आहे. “चोर तो सो सोर” या म्हणीप्रमाणे, स्वतःच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घ्यायचा आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दुसऱ्यांच्या नावाचा संशय व्यक्त करायचा, अशी खेळी कोल्हे खेळत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ‘डर्टी पॉलिटिक्स’
विवेक कोल्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, “विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना घडली असावी.” परंतु, जनतेमध्ये आता अशी चर्चा आहे की, विवेक कोल्हे स्वतःच विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी अशा हिंसक घटनांचा आधार घेऊन निवडणूक भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्याच समर्थकांकडून मारहाण करून घेऊन त्याचे खापर विरोधकांवर फोडणे, हे कोपरगावच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे आहे, अशी टीका सामान्य नागरिकांमधून होत आहे.
सखोल तपासाची मागणी
या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. कोल्हे ज्या ‘अज्ञात’ आरोपींचा उल्लेख करत आहेत, ते प्रत्यक्षात त्यांच्याच संपर्कातील युवक आहेत का? या दिशेने आता तपास होणे गरजेचे आहे. जर हे कृत्य कोल्हे यांच्या सांगण्यावरून झाले असेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता विरोधी गोटातून होऊ लागली आहे.
निवडणुकीत आपली बाजू कमकुवत होत असल्याचे पाहून विवेक कोल्हे अशा क्लृप्त्या लढवत असल्याचे बोलले जात असून, कोपरगावची जनता या ‘बनावट’ निवेदनांना बळी पडणार का, हे येणारा काळच ठरवेल.
